इच्छेची Expiry Date

काल हॉलमध्ये सोफ्यावर ३-४ पतंग व मांजाची रील पडलेली होती. मी मोबाईलमध्ये डोकावून होतो, अचानक माझे लक्ष त्या पतंगांकडे गेले आणि एकटक मी त्यांकडे बघत राहिलो. मनाच्या पुस्तकाची पाने वेगाने बालपणाकडे धाऊ लागलीत.

ह्यातलीच अशी एक पतंग मिळवण्यासाठीची तेव्हाची इच्छा आठवली. एकदा शाळा कधी सुटते आणि मी घरी जाऊन केव्हा पतंग उडवणार याची उत्कंठा न मोजता येण्यासारखी होती. कधी आपली पतंग नसल्यास तास अन् तास गच्चीवर इतर पतंगांकडे बघत राहायचो आणि त्यातली एखादी पतंग तुटून आपल्याकडे यावी अशी आस धरायचो.
आपण एक दिवस मोठी मांजा रील घेऊन सर्वात दूर पतंग उडवायची ही इच्छा होती. पण आज पतंग, मांजा समोर पडून असुनदेखील ती उत्कंठा, तो उत्साह, ती इच्छा नाही आहे.

कारण त्या इच्छेची Expiry Date (समाप्ती तारीख) निघून गेली असावी.

आपल्या इच्छांची Expiry Date असते??

नक्कीच!

बालपणी कधी लांबून ट्रेन बघायला मिळाली तर, एकटक त्याकडे बघत राहायचो, आणि असंख्य प्रश्नांनी भरलेल्या कुतुहलाच्या मनात असायची एक छोटीसी इच्छा, की कधीतरी ट्रेन मध्ये प्रवास करायचा… मग तो कुठेही का असेना.. ….इच्छा ती फक्त आणि फक्त त्या ट्रेनमधून प्रवासाची.

कदाचित तेव्हा प्रवासाची संधी मिळाली असती तर… तिकिट काढल्यापासून तर प्रवासापर्यंत आनंदाने झोप लागली नसती…आणि ट्रेन मध्ये बसल्यावर तर मन उड्या मारत बसले असते. प्लॅटफॉर्म वरची वर्दळ, तिथले लोक, होणारी Announcement, तिथली दुकाने.. आणि ट्रेन मध्ये बसल्यावर पायरीपासून, खिडकी, सीट्स, पंखे, प्रवासी, चहावाला, खेळण्यावाला आणि खिडकीतून मागे जाणारे शहर, झाडे, पुल, डोंगर, नद्या, न्याहाळत राहिले असतो. ट्रेनचा मधुर आवाज महिनाभर तरी कानात गुंजत राहला असता, हे मात्र नक्की.कारण त्या इच्छेची Expiry Date अजून बाकी होती.

आणि आज ट्रेन मध्ये गेल्या बरोबर सर्वजण मोबाइल मध्ये डोकावलेले असतात आणि लगेच झोपून राहतात. ना कुठला उत्साह, ना कुठले प्रश्न, सर्व गंभीर चेहरे. कदाचित सर्वांची ट्रेन प्रवासाच्या इच्छेची Expiry Date निघून गेली असावी.

उंच आकाशात उडणाऱ्या विमान प्रवासाच्या इच्छेबद्दलही वेगळे मत नाही.

वेळेनुसार इच्छा मरण पावतात का?

एक दिवस मला समुद्र बघायचं आहे, मला एकदातरी परदेशी जाण्याची इच्छा आहे, मला एकदातरी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायचा आहे, बसमध्ये ड्रायव्हर जवळच्या सीटवर बसायची पण इच्छा… अश्या असंख्य इच्छा असतात. त्या वेळेत पूर्ण झाल्याचं तर गगनात न मावण्याइतका आनंद आणि जर Expiry Date निघून गेली तर, हाती लागतो तो फक्त कोरडा अनुभव.

काल ज्या गोष्टीची ओढ होती, त्या सर्व गोष्टी आज जवळ असतानाही तो उत्साह नसल्याचे जाणवते.

कधी परिस्थितीमुळे तर कधी स्वतःच दिरंगाईमुळे इच्छांना पुढे ढकलत जातो. मात्र काही इच्छांना काळाची लगाम असते. ती वेळ, तो काळ निघून गेला की इच्छा असूनही ती पूर्ण होऊ शकत नाही.

पण हया इच्छाच जीवनाच्या कित्तेक क्षणांत सुगंध भरतात. ह्या इच्छाच जीवनात आशेचा किरण बनतात, ह्याच इच्छा हरलेल्यांना उभे राहून जिंकण्यासाठी प्रोत्साहित करतात. आणि ह्याच इच्छा स्वप्न बनुन जग जिंकतात.

म्हणुन आपल्या स्वप्नांना Expiry Date येण्यापुर्वीच पूर्ण करण्याची पडझळ करायला पाहिजे.

आपल्या सर्व इच्छापूर्ण होओ ही प्रार्थना.

धन्यवाद!

लेखक,
सुमित

By Sumit Tembhare

Author at Infofable

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *